एनसीबीने ‘त्या’ तिघांना का सोडले ? : नवाब मलीक यांचा सवाल

मुंबई प्रतिनिधी | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीने वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना का सोडून दिले ? याची माहिती द्यावी असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले.

 

नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीची कारवाई ही पक्षपाती असल्याचा आरोप केला. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून ११ लोकांना पकडलं. १२ तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? असे मलीक म्हणाले.

 

वृषभ सचदेवा हा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष मोहित भारतीय याचा मेहुणा आहे. या प्रकरणाचा सर्व तपास हा कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सऍप चॅटवर अवलबून आहे. मग, या तिघांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सऍप चॅट का तपासले नाहीत? असा सवालही मलिक यांनी केलाय.

 

 

भाजप नेत्याच्या मेहुण्याला आणि इतर दोघांना सोडण्यासाठी राज्य आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा दबाव होता. यातून मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. पंचनाम्यावेळी यांचे पंच आहेत, त्यांचा वेगवेगळे पत्ते देण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय.

Protected Content