रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी देणार महिला उमेदवार?

4NCP Logo h01

रावेर (प्रतिनिधी) आगामी निवडणुकामध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातून गुलाबराव देवकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षश्रेष्ठीनी आपला मोर्चा रावेर मतदार संघाकडे वळवला आहे. राष्ट्रवादी पक्षच ही जागा लढविणार असल्याची विश्वसनीय माहीती असुन ही जागा पूर्ण ताकदनिशी लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. या मतदार संघात सध्या भाजपच्या रक्षाताई खडसे खासदार आहेत. आगामी निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने, महिला म्हणून त्यांना मिळणारी सहानुभूती कमी करण्यासाठी त्यांच्याविरोधात यावेळी सक्षम महिला उमेदवार देण्याचा रा.कॉ. यावेळी गांभीर्याने विचार करीत आहे.

सध्या रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असुन येथून भाजपा’चे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई व विद्यमान खासदार रक्षाताई खडसे येथून प्रतिनिधित्व करतात. आगामी निवडणुकीतही रावेरमधून भाजपातर्फे त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा मतदार संघ कॉग्रेसकडून २००९ मध्ये राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतला होता. या मतदारसंघात लेवापाटीदार व मराठा समाजाचा प्रभाव आहे. त्यानंतर मुस्लिम,बुध्दिष्ठ समाजाचे मते असुन बाकी अल्पसंख्य आहेत.

 

मागील १० वर्षापासून येथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होत असल्याने तोडीस-तोड उमेदवार देण्याची मागणी स्थानिक पदाधिका-यांकडून होत आहे. सदया येथून राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारीसाठी माजी आ संतोष चौधरी, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी आ. अरुण पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आदी इच्छुक आहे. या मतदारसंघाचे राजकीय जाणकार सांगतात की, भाजपाच्या उमेदवाराला येथे पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने सामाजिकदृष्टीने तोडीसतोड तंत्र वापरण्याची गरज आहे. कारण येथे २००९ मध्ये हरिभाऊ जावळे (भाजपा) यांच्याविरुध्द रविंद्रभैय्या पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात जोरदार लढत झाली होती. त्यात बसपाच्या सुरेश पाटलांमुळे जावळे विजयश्री खेचण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये येथे खा.रक्षाताई खडसे (भाजपा) यांच्याविरुध्द मनिष जैन (राष्ट्रवादी) यांच्यात लढत झाली होती, त्यात जैन यांचा दारुण पराभव झाला होता.

 

आता २०१९ मध्ये भाजपकडून संभाव्य उमेदवार खा. रक्षाताई खडसेच असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी पक्षाने येथून लेवापाटीदार किंवा मराठा समाजामधून उमेदवारी द्यावी तसेच भाजपाच्या महिला उमेदवारास तोडीस-तोड राष्ट्रवादीने देखील महिला उमेदवार उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने येथून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला उमेदवारांची चाचपणी सुरु केली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याबद्दल मतदारसंघात मोठी उत्सुकता आहे.

Add Comment

Protected Content