दहावीच्या परीक्षा रद्द ; आयसीएसई बोर्डाचा निर्णय

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई  बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. याआधी बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.

 

 

सीबीएसईकडून ४ मे ते ७ जून या कालावधीत दहावीची, ४ मे ते १४ जून या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष सीबीएसईकडून जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यातील राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येत होती.

 

राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे-जूनमध्ये घेणार असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले. आता ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र राज्यातील परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Protected Content