अतिवृष्टीमुळं नुकसान ; १० हजार कोटीची तरतूद

मुंबई: वृत्तसंस्था । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधकांनीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची ही परिस्थिती जाणून घेतली. ही परिस्थिती गंभीर असल्याचं सर्वांनीच मान्य केलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्यात १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘परिस्थिती कठीण आहे. राज्य सरकारपुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत. केंद्र सरकारकडून येणे असलेले पैसेही येत नाहीत. त्याही परिस्थितीत आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

Protected Content