प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ अधिकार्‍यांना दिल्यावरून गोत्यात आलेले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या विरूद्द सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या राजीनाम्याबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.

याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ एस आर भादलीकर यांनी विद्यापीठात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याची गोपनिय माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयात तोंडी मागणी केल्यावरून माहिती पाठविली. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. तरीही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोमवारी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. कर्मचार्‍यांनी प्र कुलसचिव डॉ. एस.आर भादलीकर यांचा राजीनामा कुलगुरूंनी घ्यावा या मागणीसाठी दुपारी २ वाजेपासून कामबंद ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कृती गटाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव भैय्या पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, दुर्योधन साळुंखे, अनिल पाटील, संजय सपकाळे, अजमल जाधव, महेश पाटील, अमृत दाभाडे, जगदीश सुरळकर, आर.एम.पाटील, गोकुळ पाटील, विलास बाविस्कर, सुरेखा पाटील, वैशाली वराडे, जयश्री शिनगारे, विठ्ठल पाटील, आर.डी.पाटील, डी.बी. बोरसे, शिवाजी पाटील, भीमराव तायडे, रवि फडके, सुनिल निकम, यांच्यासह इतर कृती समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. ई. वायूनंदन यांनी या प्रकरणी मंगळवारी कार्यवाही करण्याचे मान्य केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, प्रभारी कुलगुरूंनी दिलेल्या आश्‍वासनानुसार आज प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यात त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले जातील अशी शक्यता सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे. परिणामी यावर आता नेमका काय निर्णय होणार याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Protected Content