उमरण्याच्या सरपंचपदाचा २ कोटी ५ लाखात लिलाव !

 

 

नाशिक:: वृत्तसंस्था । नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उमराणेचे माजी सरपंच प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं उमराणे सरपंचपदाचा लिलाव जिंकला. या पॅनलनं मंदिरासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावली होती.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील या घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त ग्रामस्थांनी या सभेत सहभाग घेतला. सभेत रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी लिलाव बोली लावण्यात आली. बोली जिंकणाऱ्यास सरपंच पद बहाल करण्यात येणार होते.

लिलाव पार पडल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ठरल्यानुसार बोली जिंकणाऱ्या पॅनलकडे ग्रामपंचायतीचा कारभार गेला आहे. कळवण सटाणा देवळा मालेगांव पंचक्रोशीत प्रथमच असा निर्णय झाला आहे.

Protected Content