जिल्हा रूग्णालयात ‘नो पार्कींग’च्या ठिकाणी वाहनांवर कारवाई; अधिष्ठात डॉ. रामानंद यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी ।

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाहन पार्किंगला शिस्त लागावी म्हणून रुग्णालयाच्या आवारामध्ये उभ्या केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या हवा सोडण्यात येत आहेत. वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढल्यास पोलीस दलाच्या वाहतूक शाखेची मदत घेतली जाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हाभरातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ओपीडीची वेळ असते. तसेच दिवसभरात आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी देखील रुग्णांची ये-जा सुरू असते. त्याचबरोबर रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका तसेच रुग्ण घेऊन येणारी वाहने यासह संशयित आरोपी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांना मुख्य गेट क्रमांक १ मधून प्रवेश दिला जात आहे. असे असताना देखील काही वाहनधारक हे रुग्णालयाच्या आवारामध्ये सुरक्षारक्षकांना न जुमानता वाहने लावीत आहेत, असे निदर्शनास आले आहे.

महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस महापालिकेने भुयारी गटारीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गेट नंबर २ हे महापालिकेच्या कामामुळे तात्पुरते बंद आहे. त्यासाठी वाहनांना ये-जा करण्यासाठी मुख्य गेट क्रमांक १ मधून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे. तेथून वाहन थेट पार्किंगच्या दिशेने नेऊन वाहन तळाला पार्किंग करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वाहनधारक हे त्यांचे वाहन रुग्णालयाच्या आवारामध्येच पार्किंग करीत आहेत. सुरक्षारक्षकांनी सूचना केल्यावर देखील वाहन चालक उर्मटपणे वागत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांच्या वाहनांची हवा सोडण्यात येत आहे.

मंगळवारी 29 डिसेंबर रोजी दिवसभरात ४० ते ४५ वाहनांच्या हवा काढण्यात येऊन त्यांना तंबी देण्यात आली आहे. वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढत राहिला तर यापुढे पोलीस दलाच्या वाहतूक शाखेची मदत घेऊन वाहनधारकांना शिस्त शिकविण्यात येणार आहे.

रुग्णालयात रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह उपचार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कुठल्याही वाहनधारकाने बेशिस्तपणा करून रुग्णांचा जीव धोक्यात जाईल असे कृत्य करू नये. आपले वाहन वाहनतळालाच पार्किंग करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content