ब्रिटनमधून आलेल्या सहा प्रवाशांना कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण

मुंबई प्रतिनिधी । ब्रिटनमधून भारतात आलेल्या सहा प्रवाशांना कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण झाल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे. हा नवीन विषाणू आधीपेक्षा तब्बल ७० टक्के अधिक घातक असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अलीकडेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने सक्तीचा लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. हा विषाणू अतिशय घातक असल्याने चिंतेचे वातावरण आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने आज दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये तीन नमुने बेंगळुरू, दोन नमुने हैदराबाद आणि एक नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व ६ जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या ६ जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव ७० टक्के जलदरित्या होतो. आतापर्यंत जगभरातील १६ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहेत. तर तेथून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.

Protected Content