मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे , नारायण राणे , उदयनराजे भोसले यांची वर्णी लागण्याची शक्यता

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात महाराष्ट्रातून  प्रीतम मुंडे , नारायण राणे , उदयनराजे भोसले यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

 

दिल्लीमध्ये काही दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या बैठकी घेत असल्याने केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मंत्रीमंडळ फेरबदलामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश निवडणूकीबरोबरच महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो, याची चर्चा रंगत आहे

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे सोमवारी दिल्लीला गेले राणे यांचा केंद्रीय मंत्री मंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणे हे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे  महाविकास आघाडी आणि त्यातही खास करुन शिवसेनेचे सर्वात मोठे विरोधक मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

 

खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ओरस पडवे येथे आले होते. याप्रसंगी शाह यांनी राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं होतं. अनेकजण नारायण राणे यांच्या नेतृत्वासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मी नारायण राणे यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये जेथे जेथे अन्याय होतो तेथे ठामपणे भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे बोलणारा नेता दिसतो, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं होतं.

 

भारतीय जनता पार्टीला नारायण राणेंसारख्या नेत्याला कशाप्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे ठाऊक आहे असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नारायण राणेंवर अन्याय करणार नाही. राणेंचा निश्चित सन्मान पक्षाकडून केला जाईल. तसेच कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शाह म्हणाले होते .

 

 

नारायण राणेंप्रमाणे आणखी एक नाव केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे ते म्हणजे बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम मुंडे या २०१४ साली मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच खासदार झाल्या. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्येही त्यांचा विजय झाला.

 

स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाअंतर्गत २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केल्याने महाविकास आघाडीवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रितम मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश करुन घेण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे. राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसींसंदर्भातील अनेक महत्वाचे मुद्दे प्रितम मुंडे आणि त्यांची मोठी बहीण तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे वेळोवेळी मांडत असतात.

 

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन सुरु आहे. याच विषयावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसलेंना भाजपा केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी देण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असतानाच उदयनराजे आणि नारायण राणे या दोन मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सहभागी करुन घेतले जाऊ शकते.

 

२०१९ साली उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनाराजेंचा पराभव झाला होता. नंतर उदयनराजेंना भाजपाने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं.

 

सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे या भाजपाच्या नेत्यांबरोबरच रिपब्लिकन पार्टीच्या रामदास आठवले यांचाही समावेश आहे.

 

Protected Content