आपत्ती येण्यापूर्वीचे नियोजन व प्रशिक्षण आपत्तीप्रसंगी उपयुक्त ठरते – जिल्हाधिकारी

जळगाव, प्रतिनिधी । कोणतीही आपत्ती येण्यापूर्वीचे नियोजन व प्रशिक्षण त्या आपत्तीप्रसंगी उपयुक्त ठरते, अशावेळी प्रशासनासोबत स्थानिकांचा सहभागही महत्वाचा ठरतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत जळगांव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, रावेर, भुसावळ, यावल या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे पथकाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका प्रतिनिधी, पूर प्रसंगी बचाव करणारे पट्टीचे पोहोणारे, सर्पमित्र, स्वयंसेवक, मनपा अग्निशमन विभाग, आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर जिल्हा आपत्ती निवारण पथक (DDRF) ची निर्मिती व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशाने आज जिल्हा नियोजन भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे उद्धाटनाच्या प्रथम सत्रात जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ, Sdrf टिम लीडर पो.नि.कैलास पवार, होमगार्ड सेकंड इन कमांडचे हेमंत मुदलियार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, अर्जुना संस्था अध्यक्ष नंदकिशोर पंड्या, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक, रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री चौधरी व ए जी महाजन आदि उपस्थित होते,

उद्घाटनानंतर SDRF च्या पथकाने आग, भूकंप, पूर, रस्ते अपघात, वीज पडणे याप्रसंगी काय खबरदारी घेतली पाहिजे. संकटात सापडलेल्या जनतेला कशाप्रकारे सुरक्षित बाहेर काढावे, त्यासाठी कोणते सुरक्षा उपकरणे वापरावीत यावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दुपारच्या सत्रात मेहरून तलाव येथे बुडणाऱ्या नागरिकांचा बचाव कशा पद्धतीने करावा या बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात अर्जुना संस्था, भुसावळ, वन्यजीव संरक्षण संस्थेची जीवरक्षक टीम, जळगांव, मनपा अग्निशमन दल, रेडक्रॉस, नेहरू युवा केंद्र, NSS स्वयंसेवक, आव्हान ग्रुप, मेहरून येथील प्रशिक्षित पट्टीचे पोहणारे बचाव पथक यांनी जिल्हा आपत्ती प्राधिकरण आणि राज्य आपत्ती प्राधिकरण यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्रशिक्षण पूर्ण केले.

मंगळवार, दिनांक 28 जुलै रोजी अमळनेर येथे याचप्रकारे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, लवकरच जळगांव जिल्ह्यात DDRF पथकाची निर्मिती करण्यात येणार असून यात प्रशिक्षित जीवरक्षक, वन्यजीव अभ्यासक, सर्पमित्र, पट्टीचे पोहणारे, प्रथमोपचार तज्ञ, अशा स्वयंसेवकांचा सहभाग असेल. हे पथक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत कार्य करेल असे नरवीरसिह रावळ यांनी सांगितले.

Protected Content