जिल्ह्यातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच पावसाळाही सुरु झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता घ्यावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता बी. जे. पाटील, ए. बी. किंरगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, पाळधी खुर्द व बुद्रक या गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनचे सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. आव्हाने गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या सत्यमपार्क, रोहणवाडी, हरीओमनगर या भागासाठी स्वतंत्र योजना तयार करता येईल का याचा अंदाज घेण्यात यावा. विदगावसाठी नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे अंदाजपत्रक तयार करावे, तरसोदला पाणीपुरवठा करण्यासाठी मन्यारखेडे येथून पाणीपुरवठा करता येईल किंवा कसे याबाबतचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील काम लवकरात लवकर करावे. त्याचप्रमाणे आसोदा येथे नवीन पाईपलाईन करावी. शिरसोली येथील पाण्याची टाकी जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन टाकी तयार करावी. याबाबतचे अंदाजपत्रक तयार करतांना नवीन नियमाप्रमाणे प्रती नागरीक प्रती दिवसासाठी 55 लिटर पाणी याप्रमाणे करण्यात यावे. त्याचबरोबर नशीराबाद येथील पाणीपुरवठ्याची तपासणी करुन घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिलेत.

सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होणार
जळगाव शहरातील वाघनगर भागातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. याबाबत नागरीक वारंवार तक्रारी करीत असल्याचे पालकमंत्री आणि आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत सांगितले असता वाघनगरसाठी वाघूर धरणावरील जॅकवेलचे व जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.  पाईपलाईनचे फक्त 500 मीटरचे काम अपूर्ण आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यत वाघनगराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा सुरु होईल. अशी ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बी. जे. पाटील यांनी बैठकीत दिली.  यावेळी पालकमंत्री यांनी पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम तसेच सन 2018-19 व 19-20 मध्ये कार्यारंभ आदेश दिलेल्या 219 कामांचा तालुकानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला.

Protected Content