आंदोलक शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा सरकारनेच रोखल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की “दिल्ली येथे ७० दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधा देखील केंद्र सरकारने रोखल्या आहेत.याबाबत लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी मिळून पत्र लिहिले आहे.

या पत्रात आम्हा सर्वांनी गाझीपूर बॉर्डर येथे आलेला कटू अनुभव नमूद केला आहे”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन ७१ दिवसांपासून सुरुच आहे. त्यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गाझीपूर सीमेवर जात परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत १० विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते उपस्थित होते. गाझीपूर बॉर्डरवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या नाकाबंदीवर हे नेते पोहोचले असता त्यांना पोलिसांनी रोखलं

 

“निर्वाचित लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटू दिले जात नाही हे खेदजनक असून लोकसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी विनंती या पत्रात केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी अशी मागणी देखील केली आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा करुन शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा मेसेज त्यांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेवरुन आम्ही भेटायला आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टीकैत यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार प्रहार केले. देशात लोकशाही शिल्लक आहे काय, असं विचारत केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी ज्या प्रकारे वागत आहे ते निषेधार्ह असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Protected Content