मोदींच्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचं तिकीट नाकारलं आहे.

नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. काल भाजपाकडून उमेदवारांची घोषणा केली गेली. पण त्यात सोनल मोदी यांचं नाव कुठल्याच वॉर्डातून घोषित केलं गेलेलं नाही. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील म्हणाले कि सर्वांसाठी नियम सारखे आहेत. आणि नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा पक्षाचा निर्णय झाल्याचं म्हणाले. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारलं गेल्याचं कळतंय.

तिकीट नाकारल्यानंतर सोनल मोदी यांची प्रतिक्रिया बोलकी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितलं होतं असं सोनल म्हणाल्या. सोनल मोदी ह्या मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहे. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. सोनल मोदी ह्या भाजपात काही काळापासून काम करतात.

गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, बडोदा, भावनगर, जामनगर महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे . ८१ नगरपालिका, ३१ झेडपी आणि २३१ पंचायत समितींसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

Protected Content