डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कंडारी ग्रामसभेतर्फे सत्कार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळवून गावाचे व शाळेचे नाव डॉ. जगदीश पाटील यांनी राज्यपातळीवर झळकविले आहे. त्याबद्दल जळगाव तालुक्यातील कंडारी येथील ग्रा.पं. कार्यालयात प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून ग्रामगौरव करण्यात आला.

ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यशोदाताई सोनवणे तर सचिव जि.प. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक तुषार लोहार होते. उपसरपंच प्रकाश पाटील यांनी अभिनंदन ठरावाचे वाचन केले. ठरावात नमूद करण्यात आले आहे की, कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश पाटील सर यांना मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने कंडारी गाव व जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यपातळीवर झळकले आहे. कंडारी गावासाठी व शाळेसाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

त्यानंतर सरपंच यशोदाताई सोनवणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. जगदीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मनोरमाताई पाटील, कंडारी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक तुषार लोहार, शिक्षक संतोष वानखेडे, कंडारी उपसरपंच प्रकाश पाटील, ग्रा.पं. सदस्य मल्हारराव देशमुख, समाबाई पिंजारी, लताबाई जाधव, अविनाश सोनवणे, सुरेखाबाई देशमुख, कृष्णा भील, अरूणा धनगर, सुनील सुर्वे यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी गोपाल रिवाजकर, श्याम निकम, प्रवीण सुर्वे आदी उपस्थित होते.

Protected Content