बीजिंग: वृत्तसंस्था । . व्यापार करार, कोरोनाच्या मुद्यावर उभा संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेने तैवानला मदत करत चीनला आणखीच डिवचले आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.आता अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा इशारा आता चीनने दिला आहे.
. तैवानला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी अमेरिकेच्या बोइंग, लॉकहीड मार्टिन या कंपन्यांसह इतर अमेरिकी कंपन्यांवर निर्बंध घालू, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तैवानला अमेरिकी शस्त्रांची विक्री वाढल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हा इशारा दिला आहे.
चीन-अमेरिका यांच्यात संरक्षण सहकार्य फारसे नसल्याने अमेरिकेच्या कंपन्यांवर निर्बंध घातल्याचा परिणाम नेमका काय होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला १३५ ‘लँड अॅटॅक मिसाइल एक्स्पांडेड रिस्पॉन्स’ ही प्रणाली देण्यास मंजुरी दिली. एक अब्ज डॉलरहून अधिक किमतीचा हा व्यवहार आहे. अमेरिका हा तैवानचा मुख्य शस्त्र पुरवठादार देश आहे. अमेरिकेने अकरा ‘हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम’, एम-१४२ लाँचर्स आणि इतर शस्त्रांची विक्रीही अमेरिका तैवानला करणार आहे. सहा एमएस-११० रेक्के पॉड्स यांचाही समावेश आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले, ‘अमेरिकेने तैवानला शस्त्रविक्री केल्यामुळे चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला धक्का पोहोचत आहे. चीनने अमेरिकेला वारंवार सांगितले आहे. सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या बाबतीतील हितसंबंधांनाही बाधा पोहोचत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. शस्त्रविक्री करणाऱ्या प्रक्रियेमध्ये सहभागी मोठ्या अमेरिकी कंपन्यांवर आम्ही निर्बंध घालू.’ यामध्ये बोइंग, लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
तैवान हा चीनचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीनमध्ये माओंच्या नेतृत्वात क्रांती झाल्यानंतर चीनचा राजा आपल्या समर्थकांसह तैवानमध्ये पोहचला होता. त्यावेळी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या फौजांकडे नौदल नसल्यामुळे त्यांना तैवानला जाणे शक्य झाले नाही. त्यावेळी चीनच्या राजाने तैवानला रिपब्लिक ऑफ चायना घोषित केले. चीननेदेखील ‘वन चायना’ धोरण सुरू केले. या धोरणातंर्गत ज्या देशांना चीनसोबत राजकीय आणि व्यापारी संबंध ठेवायचे असतील त्या देशांनी तैवान हा चीनचा एक भाग असल्याचे मान्य करणे आणि चीनसोबत व्यवहार करणे आदी अटी ठेवल्या होत्या. मात्र, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानला बळ देण्यास सुरुवात केली आहे.