बोंबला… : आता कोरोना सोबत फ्लोरोनाच्या संसर्गाचा धोका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | जगभरात एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसाराचा धोका वाढला असतांना आता फ्लोरोना नावाचा नवीन विकार समोर आला असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. जगात याचा पहिला रूग्ण इस्त्राएलमध्ये आढळून आला आहे.

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची दहशत पसरली आहे. यामुळे विशेष करून युरोपात मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. तर आता कोरोना आटोक्यात येत नसतांना याचाच भाऊबंद असणार्‍या फ्लोरोना या नवीन विकाराचा प्रकोप सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. इस्रायलमध्ये फ्लोरोना रोगाचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. फ्लोरोना हा नवीन विकार असून याच्या अंतर्गत कोविड -१९ आणि इन्फ्लूएंझा यांचा दुहेरी संसर्ग झालेला असतो.

फ्लोरोनाची लक्षणे, निदान आणि उपचार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, या रोगाचा पहिला पेशंट आढळून येताच इस्त्राएलमध्ये तातडीने प्रतिकारासाठी पावले उचलली आहेत. या प्रामुख्याने नागरिकांना लसीकरणाचा चौथा डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. लसीचा तिसरा डोस घेतलेल्यांनाच हा चौथा डोस देण्यात येत असल्याची माहिती इस्त्राएलच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

इस्त्राएलने कोरोनावर सर्वात परिणामकारक उपाययोजना केल्या होत्या. याच देशात सर्वात पहिल्यांदा लसीकरण झाले होते. यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेचा इस्त्राएलने चांगला प्रतिकार केला. आता ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असले तरी येथे यामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. मात्र आता कोरोना नष्ट होत नाही तोच फ्लोरोना आल्यामुळे तेथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाचे आजवर अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमायक्रॉन आणि डेलमायक्रॉन आवृत्त्या जगासमोर आलेल्या आहेत. यात आता फ्लोरोनाची नव्याने भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाची सुरूवात चीनमधून झाली होती. तर फ्लोरोनाचा आरंभ हा इस्त्राएलमधून झाल्याचे आता अधोरेखीत झाले आहे.

Protected Content