Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान...

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हे अभियान आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान आशेचा किरण ठरत आहे.

११ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत रावेर तालुक्यातील तब्बल ९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये आतापर्यंत ३०५४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ६४८ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४४५ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाली आहे.

या अभियानातील विशेष बाब म्हणजे एचआयव्ही आणि हिपॅटायटिस-बी बाधित पाच रुग्णांवरही सर्व आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करून यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे गंभीर संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांनाही सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य सेवेत सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक रुग्णापर्यंत उपचार पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.

नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी करण्यात आली असून अनेकांना योग्य उपचार व आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत असल्याचे चित्र आहे.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, “रावेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. भविष्यातही ग्रामीण भागात अशाच आरोग्यसेवा अभियानांना प्राधान्य देत ‘मोतीबिंदूमुक्त रावेर’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” त्यांनी एचआयव्ही व हिपॅटायटिस-बी बाधित रुग्णांवरही सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा उल्लेख करत आरोग्यसेवेत गुणवत्ता व संवेदनशीलतेला प्राधान्य दिल्याचे सांगितले.

मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. या टीममध्ये डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे. तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांनीही अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अभियानाच्या अंतिम टप्प्यात आता रावेर शहरात प्रभागनिहाय २८ व ३० मे रोजी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound