Home आरोग्य जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त जीएमसी जळगावमध्ये जनजागृती 

जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त जीएमसी जळगावमध्ये जनजागृती 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे तंबाखूविरोधी व्यापक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. दंतशास्त्र विभागाच्या ओपीडीमध्ये आयोजित या उपक्रमाला रुग्ण, नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या उपक्रमातून तंबाखूमुक्त समाजाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा जागतिक तंबाखूमुक्त दिन “आकर्षणाचा मुखवटा काढा – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला आळा घाला” या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांविषयी तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचवणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि उपस्थित नागरिकांना तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे विकार, दातांचे नुकसान तसेच इतर गंभीर आजारांविषयी माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी तंबाखूचे व्यसन सोडण्याचे आरोग्यदायी फायदेही नागरिकांना समजावून सांगितले.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दंतशास्त्र विभागाच्या ओपीडी परिसरात आयोजित करण्यात आलेली रांगोळी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी संदेश देणाऱ्या आकर्षक आणि सामाजिक भान जपणाऱ्या रांगोळ्या साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “व्यसनमुक्त समाज”, “तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार” अशा संदेशांमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी सामूहिक तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. स्वतः तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही आणि आपल्या कुटुंबीयांसह समाजातील इतरांनाही या घातक व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करू, असा निर्धार यावेळी करण्यात आला. नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तंबाखूमुक्त समाज निर्मितीच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपवैद्यकीय अधीक्षक तथा दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इम्रान पठाण, वरिष्ठ निवासी डॉ. रोझल ठाकूर, डॉ. प्रशांत बावस्कर आणि दंत आरोग्य तज्ज्ञ सूर्यकांत विसावे यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. शिवानी सिंग, सामाजिक कार्यकर्ते राहुल बारहाटे, दंत सहायक राकेश पाटील आणि पवन कोळी यांनीही नियोजनात मोलाचे योगदान दिले.


Protected Content

Play sound