Home क्राईम भुसावळात खळबळ : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात!

भुसावळात खळबळ : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात!


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) आणि त्याच्या खाजगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. राजू सांगळे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, सलीम हकीम कुरेशी असे लाच घेणाऱ्या खाजगी पंटरचे नाव आहे. या धडक कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील तक्रारदाराला संबंधित गुन्ह्यात अटक न करता, केवळ प्रतिबंधात्मक (चॅप्टर) कारवाई करून सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांनी त्यांचा खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी याच्या माध्यमातून तक्रारदाराशी तडजोड केली आणि लाचेची रक्कम २० हजार रुपये निश्चित केली. ठरल्याप्रमाणे पंटर सलीम याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाचेची मागणी करताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंटर सलीम कुरेशी याला जागीच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ही रक्कम पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्या सांगण्यावरूनच मागल्याची कबुली दिली. या निष्पन्नानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत पीएसआय राजू सांगळे यांनाही अटक केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीच्या या धडक कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Protected Content

Play sound