अभिनेत्री कंगना राणावत विरोधात गुन्हा दाखल करा

पाचोरा, प्रतिनिधी | नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेली चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने  १९४७ मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र नसून मिळालेली भीक आहे, खरे स्वातंत्र्य सन – २०१४ ला मिळालेले आहे. असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करून लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले तन मन धनाने संपूर्ण आयुष्य बलिदान केलेल्या लाखो स्वातंत्र्यवीरांच्या कष्टाचा आणि कर्तुत्वाचा या कंगना राणावत हिने अपमान केला आहे. त्यामुळे कंगना विरोधात तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तिला दिण्यात आलेला पद्मश्री किताब तातडीने परत घ्यावा अशी मागणी पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे पोलिस प्रशासनास निवेदन देवुन करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रवक्ता तथा मा. उपप्राचार्या प्रा. मंगला शिंदे यांनी कंगना राणावतला चर्चेसाठी खुले आव्हान करत तिच्या बुद्धीची शुद्धी करण्यासाठी आणि तिने ‘१९४७ चे कोणते युद्ध झाले हे मला सांगावे तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेल; ,असे वक्तव्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आणि सन १८५७ चे युद्ध, सन – १९४७ चे भारतीय स्वातंत्र्य आणि कंगनाच्या भाषेत तिला मिळालेले सन – २०१४ चे स्वातंत्र्य याबाबत चर्चेसाठी खुले आवाहन ही दिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर खान यांनी कंगना राणावतच्या विरोधात लाखों स्वातंत्र सैनिकांचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तिला देण्यात आलेल्या सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्यात यावे असे मत व्यक्त केले. निवेदन देते वेळी नगरसेविका सुचिता वाघ, राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा रेखा पाटील, शहराध्यक्ष रेखा देवरे, युवतींच्या तालुकाध्यक्षा अभिलाषा रोकडे, प्रा. सुनिता गुंजाळ, प्रा. वैशाली बोरकर, रंजना वारुळे, सुरेखा पाटील, सरला पाटील, स्नेहा गायकवाड या महिला व भगवान मिस्री, हेमंत पाटील, योगेश कुमावत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content