वाळूचे ट्रॅक्टर चालू ठेवत तस्कराने ठोकली धुम; ड्रायव्हरच्या धाडसाने टळला अनर्थ !

 

पाचोरा प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाचा प्रांताधिकारी पाठलाग करत असतांना त्याने ट्रॅक्टर चालू ठेवून पळ काढल्याची घटना आज पाचोरा येथे घडली. प्रांताधिकार्‍यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून ट्रॅक्टरचे ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे हे शासकीय वाहनातून पाचोरा-भडगाव रस्त्यावरून जात असतांना त्यांना पुनगाव हद्दीत एक ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत असतांना दिसून आले. त्यांनी हाताने इशारा करून आणि स्पीकरमधून इशारा देऊन ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. मात्र ट्रॅक्टर चालक न थांबता तो वेगाने पुढे निघाला. यामुळे प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरानंतर चालू ट्रॅक्टरवरून उडी मारून चालक पळून गेला. हे ट्रॅक्टर वेगाने समोर धावू लागले. समोरच घरे होती व अंगणात काही मुले खेळत होती.

दरम्यान, भयंकर अपघाताची शक्यता दिसत असल्याने प्रांताधिकार्‍यांच्या वाहनाचे चालक अजीज बेग अन्वर बेग मिर्झा यांनी आपला जीव धोक्यात घालून चाल ट्रॅक्टरला ब्रेक लाऊन थांबविले. यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Protected Content