अपेक्षेपेक्षा अर्थव्यवस्थेत जलद सुधारणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोविड-१९ साथीमुळे कोलमडलेली देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जलद गतीने सुधारत आहे, असे सांगत विजेची वाढलेली मागणी आणि वाढलेले जीएसटी संकलन हे याचे द्योतक असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

कॅबिनेट बैठकीचे वृत्त प्रसारमाध्यमांना देताना ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, रेल्वे मालवाहतुकीत झालेली वाढ, जीएसटी संकलनातील वाढ आणि थेट विदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ यावरून अर्थव्यवस्थेची स्थिती चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चांगली होती, हे स्पष्ट झाले आहे. विजेच्या मागणीत १२ टक्के वाढ हे तर अर्थव्यवस्था पूर्णतः रुळांवर आल्याचे द्योतक आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्था २३.९ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर आक्रसली होती. या काळात देशात लॉकडाउन होता, त्यामुळे आर्थिक व व्यावसायिक उलाढाल होऊ शकली नव्हती. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी आक्रसेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेनेही वर्तवला आहे.

जीएसटी संकलन १.०५ लाख कोटी रुपये (वार्षिक आधारावर १० टक्के वाढ) झाले. ऑक्टोबर महिन्यात ई-वे बिलांमध्ये १९ टक्के वाढ होऊन १६.८२ लाख कोटींची ई-वे बिले दिली गेली. रेल्वे मालवाहतुकीत सप्टेंबरमध्ये १५.५ टक्के, तर ऑक्टोबरमध्ये १४ टक्के वाढ. एप्रिल ते ऑगस्ट या काळात थेट विदेशी गुंतवणूक ३५.७३ अब्ज डॉलर इतकी झाली.

Protected Content