गोस्वामींना अटक करणार्‍या पोलिसांना निलंबित करा : राम कदम

 

मुंबई : वृत्तसंस्था । भाजपचे नेते राम कदम यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामी यांना अटक करणार्‍या पोलिसांना निलंबीत करण्याची मागणी केली.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले.

आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राम कदम यांनी सांगितले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही असे राम कदम म्हणाले आहे.

दरम्यान आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं राम कदम यांनी सांगितले.

Protected Content