अटक जगण्याच्या हक्काचे उल्लंघन करणारी

मुंबई: वृत्तसंस्था । पोलिसांनी केलेली ही अटक म्हणजे जगण्याचा हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा करत एफआयआर रद्द करण्याची विनंती अर्णब गोस्वामी यांनी या फौजदारी रिट याचिकेत केली आहे.

अलिबागमधील अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारतचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एफआयआरवरील कारवाईला स्थगिती देऊन तात्काळ सुटका करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही गोस्वामी यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.

‘बुधवारी पहाटे माझ्या घरात जवळपास २० पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मला जबरदस्ती ओढत नेऊन पोलिस वाहनात डांबले. माझ्या मुलालाही त्यावेळी मारहाण केली. जे प्रकरण पूर्वी बंद झाले आहे ते केवळ सूडाच्या भावनेतून आणि बदला घेण्याच्या उद्देशाने पुन्हा सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्यांना माझ्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मी प्रश्न विचारत आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत आहे, म्हणूनच मला लक्ष्य करण्यात आले. राजकीय हेतूने प्रेरित माझ्यावर अटक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मला मारहाण करत आणि बेकायदा पद्धतीने अटक केली आहे’, असा दावा गोस्वामी यांनी याचिकेत केला आहे.

‘दिवंगत आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कामाच्या संदर्भात मी त्यांच्याशी थेट संपर्कात नव्हतो. कोणत्याही मोठ्या कंपनीत उच्च पदावरील व्यक्ती ही दैनंदिन व्यवहार आणि वेगवेगळ्या कामांच्या संदर्भातील आर्थिक व्यवहारांशी थेट संबंधित नसते. कंपनीचा वित्त विभाग त्या गोष्टी सांभाळत असते. त्यामुळे नाईक यांच्या व्यवहाराशी माझा थेट संबंध आला, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. माझ्या कंपनीने नाईक यांच्या कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या थकित रकमेपैकी ९० टक्के रक्कम दिलेली आहे’, असा दावा गोस्वामी यांनी याचिकेत केला आहे.

‘माझ्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनीही गुन्हा दाखवता आलेला नाही. असे असताना मला पूर्णपणे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. माझे काम पाहता केवळ एका दिवसाच्या अनुपस्थितीचाही वृत्तवाहिन्या आणि त्यातील कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या संदर्भात मोठा परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे एफआयआरवरील कारवाईला स्थगिती देऊन माझी तात्काळ सुटका करण्याचे निर्देश द्यावेत.

एफआयआरच्या आधारे माझ्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना द्यावेत. तसेच सुनावणीअंती हा एफआयआर रद्द करण्याचे आदेश द्यावेत’, अशी विनंतीही गोस्वामी यांनी याचिकेत केली आहे.

Protected Content