Home Uncategorized बास्केटबॉल व लॉन टेनिस कोर्ट दुरुस्तीसाठी युवासेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

बास्केटबॉल व लॉन टेनिस कोर्ट दुरुस्तीसाठी युवासेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांदरम्यान बास्केटबॉल कोर्ट आणि लॉन टेनिस मैदानाच्या दुरवस्थेकडे युवासेनेने लक्ष वेधले आहे. या दोन्ही मैदानांची तातडीने दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी यांना निवेदन सादर केले.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात विविध विकासकामे आणि सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. संकुलातील दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात बास्केटबॉल कोर्ट तसेच लॉन टेनिसचे मैदान असून या मैदानांवर वर्षभर विविध स्तरांवरील स्पर्धा आणि सराव सत्रांचे आयोजन केले जाते. जिल्ह्यातील अनेक खेळाडू या मैदानांवर नियमित सराव करत असतात. मात्र संपूर्ण संकुलात आधुनिक सुविधा निर्माण होत असताना ही दोन्ही मैदाने जुनी आणि नादुरुस्त अवस्थेत असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या मैदानालगतच ॲथलेटिक्स खेळासाठी आकर्षक आणि सुसज्ज रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलत असताना केवळ बास्केटबॉल आणि लॉन टेनिस मैदानांची अवस्था दुर्लक्षित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. मैदानावरील पृष्ठभाग खराब झाल्यामुळे खेळाडूंना सराव करताना अडचणींचा सामना करावा लागत असून दुखापतींचाही धोका वाढला असल्याचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या मैदानांची दुरुस्ती करून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक असल्याचे मत युवासेनेने व्यक्त केले. जिल्हा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्याने क्रीडा संकुलातील सर्व मैदानांची गुणवत्ता टिकवून ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अजय खैरनार, राहुल चव्हाण, पियुष हसवाल, लोकेश पाटील, कार्तिक खैरनार, गणेश भोई आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल आणि लॉन टेनिस मैदानांच्या दुरुस्तीची मागणी आता खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमधूनही जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यास जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊन क्रीडा विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound