Home Cities जळगाव भाऊंच्या उद्यानात उद्या रंगणार ‘बालरंग’चा कलोत्सव 

भाऊंच्या उद्यानात उद्या रंगणार ‘बालरंग’चा कलोत्सव 

0
101


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालकलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वानंद कलायत्री आणि स्वरवेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरंग’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ मे शनिवार रोजी भाऊंच्या उद्यानातील एम्पी थिएटर येथे सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत हा कार्यक्रम रंगणार असून, शहरातील ५० हून अधिक बालकलावंत विविध कलांचे सादरीकरण करणार आहेत.

‘५ कला, १ कार्यक्रम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या उपक्रमामध्ये ३ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलाकार सहभागी होणार आहेत. शहरातील विविध संगीत, नृत्य आणि नाट्य गुरुकुलांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्या कलाकारांकडून गायन, वादन, नृत्य, श्लोकपठण, अभिनय आणि सूत्रसंचालन अशा विविध कलांचा सुरेल आणि आकर्षक संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

बालरंग या कार्यक्रमाची संकल्पना सौ. अपूर्वा वाणी यांची असून, बालकांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांचे कलात्मक उपक्रमांकडे कमी होत चाललेले आकर्षण लक्षात घेता, अशा कार्यक्रमांमुळे मुलांना प्रत्यक्ष मंचावर सादरीकरणाची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकलावंतांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांना कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि पालकांना आपल्या मुलांच्या कलागुणांचा अभिमान वाटावा, या हेतूने विशेष नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी सहभागी बालकलावंतांकडून गेल्या काही दिवसांपासून विशेष सराव सुरू असून, रंगतदार सादरीकरणासाठी ते उत्सुक आहेत.

या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शहरातील रसिक श्रोते, पालक आणि बच्चेकंपनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भागवत पाटील आणि पुष्कराज वाणी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound