बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपराळा परिसरातील शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

( प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र )

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्राच्या परिसरात बिबट्यासह हिंस्त्र प्राण्यांचा संचार असल्याचे आधीच अनेकदा दिसून आले आहे. अनेकदा प्राणी हे शेतकरी अथवा शेतमजुरांवर हल्ला करत असतात. अशीच एक दुर्घटना शनिवारी घडली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातल्या वढोदे वनक्षेत्राच्या अंतर्गत असलेल्या पिंपराळा शिवारात दुपारी दीडच्या सुमारास कुर्‍हा परिसरातील शिवारात असलेल्या शेतात काम करणार्‍या गणेश गणपत झाल्टे ( वय २८) या तरूणावर बिबट्याने हल्ला केला. यात तरूण गंभीर जखमी झाला. या हल्लयाची माहिती मिळताच परिसरातील शेतकर्‍यांनी धाव घेऊन या तरूणाला रूग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमोपचार करून त्याला जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या परिसरात आधी देखील बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले असून वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीमधील वावर वाढत आहे. यामुळे वन खात्याने यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता परिसरातून करण्यात येत आहे.

Protected Content