एमपी, राजस्थानमध्ये भाजप तर छत्तीसगड व तेलंगणात कॉंग्रेसची आघाडी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज प्रारंभ झाला असून मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये भाजपने भक्कम आघाडी घेतली असून छत्तीसगड व तेलंगणामध्ये कॉंग्रेसला आघाडीचा कल मिळाल्याचे दिसून आले आहे.

अलीकडेच पाच राज्यांची विधानसभा निवडणुक झाली. यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरमचा समावेश होता. यातील मिझोरमची मतमोजणी ही उद्या होणार आहे. तर उर्वरित चारही राज्यांची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली. यातील पहिल्या टप्प्यात तेलंगणा वगळता तिन्ही राज्यांमध्ये जोरदार सुरस होईल असे संकेत होते. तर तेलंगणात पहिल्यापासून कॉंग्रेसने आघाडी घेतली.

दरम्यान, काही वेळातच कलांचे चित्र बदलले. मध्यप्रदेशात आधी चुरशीची वाटणारी निवडणूक ही भाजपच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. राजस्थानातही हेच चित्र दिसून आले आहे. सध्याचा कल पाहता मध्यप्रदेशात भाजपला तब्बल १४६ जागांवर आघाडी मिळाली असून कॉंग्रेसचे ८३ उमेदवार आघाडीवर आहेत. राजस्थानात विद्यमान कॉंग्रेस सरकारचा पराभव होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. ताज्या कलानुसार कॉंग्रेस ११८ जागांवर आघाडीवर असून भाजपला अवघ्या ६८ जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये आधी कॉंग्रेसला मोठी आघाडी मिळाली असली तरी येथे देखील चुरस दिसून आली आहे. यात कॉंग्रेस ४५ तर भाजप ४४ जागांवर आघाडीवर आहे. अर्थात हाच कल कायम राहिला तर उर्वरित एक अपक्ष उमेदवार हा किंगमेकर बनणार आहे. तेलंगणामध्ये विद्यमान भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचा पराभव होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. १२० जागांच्या विधानसभेत येथे कॉंग्रेसला ६५ जागांवर आघाडी मिळाली असून ४६ जागांवर बीआरएसला आघाडी आहे. यामुळे येथे दोन पंचवार्षिकपासून सत्तेत असणार्‍या के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content