जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या हॉटेल्स आणि लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बलात्कार, मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळची जळगावची असणारी आणि सध्या पुणे येथील वारजे भागात नोकरीनिमित्त राहणारी २३ वर्षीय पीडित तरुणी आणि संशयित आरोपी रोशन मुकेश निकम (वय ३३ वर्षे, रा. निमखेडी, जळगाव) हे परिचयाचे होते. संशयित आरोपी रोशन याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मार्च २०२४ ते मे २०२६ या कालावधीत त्याने जळगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

काही दिवसांपूर्वी पीडितेने रोशनकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास साफ नकार दिला. दरम्यान, आरोपी रोशनचे दुसऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध (अफेअर) सुरू असल्याची माहिती पीडितेला मिळाली. याबाबीचा जाब विचारण्यासाठी पीडित तरुणी गेली असता, संशयित आरोपीने तिला बेदम मारहाण केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



