प्रकट मुलाखतीतून युवा अधिकाऱ्यांनी उलगडले यशाचे गमक

ddcd8470 c648 4ab1 b423 83a8feac1257

 

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळेच्‍या माध्यमातून शिक्षण घेऊन उच्च पदांवर जाता येते. आईवडील शेतकरी-मजूर असूनही त्यांचे स्‍वप्‍न पूर्ण करता येते. स्‍पर्धा परीक्षांची तयारी करताना प्रतिकूल परिस्‍थिती आडवी आली. तर त्‍याच परिस्‍थितीला प्रेरणा मानून अपेक्षित यश संपादित करता येते, असा सूर युवा अधिकाऱ्यांनी प्रकट मुलाखतीतून व्‍यक्‍त केला.

 

अमळनेर येथे सुरू असलेल्या साने गुरुजी मोफत स्‍पर्धा परीक्षा केंद्रात आयोजित कार्यशाळेत ‘पीएसआय’ संदीप भेाई (अमळनेर), ‘पीएसआय’ गोकुळ पाटील (कळमोदा, ता. रावेर), ‘पीएसआय’ विशाल देवरे (सुरपान, ता. साक्री), ‘पीएसआय’ शेखर बागूल (खडकी, ता. मालेगाव), विक्रीकर निरीक्षक स्‍वप्‍नील वानखेडे (अमळनेर), ‘पीएसआय’ शरद सैंदाणे (नांदेड, ता. धरणगाव), पोलिस चंदन पाटील (पैलाड, अमळनेर) या युवा अधिकाऱ्यांची प्रकट मुलाखत पत्रकार तथा शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे यांनी घेतली.

 

 

गोकूळ पाटील म्‍हणाले, की स्‍वप्‍न सत्त्यात उतरविण्यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्टा करा. स्‍पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्‍वयं अध्ययनावर भर द्या. कोणत्‍याही क्‍लासच्‍या भानगडीत पडू नका. संदर्भ पुस्‍तकांचा अभ्यास करा. यश आपोआप मिळेल. संदीप भोई म्‍हणाले, की अभ्यासाचे योग्‍य नियोजन व सातत्‍य राखल्‍यास स्‍पर्धा परीक्षांमध्ये पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळू शकते. ‘पीएसआय’च्‍या परीक्षेसाठी प्रयत्‍न करणाऱ्यांनी शारिरीक व्‍यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे. शेखर बागूल म्‍हणाले, की सामान्‍य परिस्‍थिती असली तरी कधीही डगमगू नका. जिद्द आणि चिकाटी ठेवल्‍यास यश निश्‍चितच मिळते. अपयश आले तरी खचून जाऊ नका. कितीही मोठ्या पदांवर गेले तरी आपले गाव व आपला भूतकाळ विसरू नका.

 

 

विशाल देवरे म्‍हणाले, की राजकारणात जाण्यापूर्वी शिक्षण घेऊन स्‍वतःच्‍या पायावर उभे राहा. स्‍वतःचे अस्‍तित्‍व निर्माण करा. कोणाचा झेंडा हातात धरण्यापेक्षा स्‍वतःच्या अस्तित्वाचा झेंडा रोवा. नेहमी चांगल्या लोकांच्‍या सहवासात राहा. स्‍वप्‍नील वानखेडे म्‍हणाले, की स्‍पर्धा परीक्षेच्‍या माध्यमातून अधिकारी पद मिळविल्‍यानंतरही प्रशासनाचा मार्ग हा खडतर असतो. तो आपल्‍या संस्‍कारांनी तसेच नैतिक मुल्‍यांनी सुकर करता येतो. शरद सैंदाणे म्‍हणाले, की ‘पीएसआय’च्‍या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या प्रबळ केले जाते. त्‍यात प्रत्‍येकाचीच कसोटी लागते. जीवनात कधीही भ्रष्टाचाराला वाव देऊ नका. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. वाचनालयाचे संचालक श्री. भादलीकर, व्‍ही. एन. ब्राम्‍हणकर, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, व्‍ही. ए. पवार, शरद पाटील, सतीश कांगणे, टी. के. पावरा, सोपान भवरे, के. एल. पाटील आदी उपस्‍थित होते.

Add Comment

Protected Content