वीज धक्का लागून पहूर येथील तरूणाचा मृत्यू

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । जळगाव -औरंगाबाद महामार्गावरील विद्युत वाहिनीचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून रोजंदारी वर मजुर म्हणून काम करणार्‍या २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पहूर येथे घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,पहूर -कसबे येथील रहीवासी हमाल शकिलखान पठाण यांचा मुलगा अकिलखान पठाण हा तरुण रोजंदारीने मजूर म्हणून विद्युत कंपनीच्या ठेकेदाराकडे कामास होता. जळगाव -औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे नवीन तारा ओढण्याचे काम सुरु आहे. येथेच तो काम करत होता. अजिंठा पेट्रोल पंपाजवळ लोकमान्य टिळक नगर येथे जुन्या तारा काढून नवीन तारा ओढण्याचे काम सुरू असतांना अकिलखान शकीलखान पठाण हा तरुण सिमेंटच्या विज खांबावर चढला. तो ज्या वीज खांबावर चढला होता, त्या खांबावरील वीजपुरवठा बंद होता. मात्र त्याच वाहिनीच्या जवळून ११ केव्हीए क्षमतेच्या वीजवाहिनीतून वीज प्रवाह सुरू होता. कामाच्या ओघात अकील उभा राहताच त्याच्या डाव्या हाताला मुख्य विज वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला आणि सुमारे २० फूटांवरून तो खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यास सोबतच्या सहकार्‍यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .

दरम्यान, आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच वडील ग्रामीण रुग्णालयात आले. अकिलचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. आई -वडिलांनी हमाली तसेच दुसर्‍यांच्या शेतात मोल- मजूरी करून लहानाचा मोठा केलेल्या मुलाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत अकिलच्या मागे आई -वडील , लहान भाऊ , २ बहीणी असा परिवार आहे.

Protected Content