मु.जे. महाविद्यालयात ‘योग संगम’ सामूहिक योग साधना; महिलांसाठी मोफत योग थेरपी शिबिर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक स्तरावर ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, शनिवार, २१ जून रोजी जळगावात ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संचार ब्यूरो शाखा जळगाव आणि मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या स्केटिंग ग्राउंडवर सकाळी ७ वाजता होणार आहे.

या ‘योग संगम’ कार्यक्रमात ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’नुसार योग साधनेचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी आणि योगप्रेमींकडून करून घेतले जाईल. यामुळे योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे समाजात रुजण्यास मदत होईल.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण मंदिर जळगाव येथील स्वामी नयनप्रकाशजी उपस्थित असतील. त्यांच्यासोबत मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य सुषमा कंची, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, प्राचार्य युवा कुमार रेड्डी, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांतजी वडोदकर, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, आणि लेफ्टनंट आश्विन वैद्य यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

योग दिनानिमित्त एक विशेष उपक्रम म्हणून, २३ जून ते ३० जून या कालावधीत महिलांसाठी निःशुल्क योग थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोहम योग विभागामध्ये संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत त्रिवेणी समूहाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होईल. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.