महावितरणचा खुलासा ; ‘त्या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही’


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात एका कंत्राटदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला. काही प्रसारमाध्यमांनी ‘एमएसईबी’च्या कंत्राटाचे पैसे थकीत असल्याच्या मथळ्याखाली या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र, या प्रकरणाशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचा खुलासा महावितरणने केला आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरालगत असलेल्या चिंचोली उपकेंद्राच्या उभारणीचे काम मेसर्स लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कामाचे १०० टक्के बिल महावितरणने संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीच अदा केले आहे. महावितरणकडे या कामाचे कोणतेही बिल प्रलंबित नाही. त्यामुळे, आजच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाच्या आंदोलनाशी महावितरणचे कोणतेही प्रकरण संबंधित नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.