Home Uncategorized मेहरुण स्मशानभूमीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अन्यथा ‘तिरडी मोर्चा’चा इशारा

मेहरुण स्मशानभूमीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अन्यथा ‘तिरडी मोर्चा’चा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  मेहरुण परिसरातील स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्न आता चांगलाच तापला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, माजी महानगराध्यक्ष अशोक सीताराम लाडवंजारी यांनी महापौर दीपमाला काळे यांना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे थेट ‘तिरडी आंदोलना’चा इशारा दिला आहे. याप्रसंगी सुनिल माळी, किरण राजपूत आदी उपस्थित होते.

मेहरुण स्मशानभूमी विकसित करण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी ६ मार्च २०२६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती, मात्र या न्यायपूर्ण मागणीचा प्रशासनाने कोणताही विचार केला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या निवेदनात मेहरुण स्मशानभूमीच्या दुरवस्थेचे वास्तव मांडताना लाडवंजारी यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोकाकुल बांधवांसाठी सुसज्ज शेड, स्मशानभूमीला संरक्षण भिंत (कंपाऊंड), लाकूड आणि गोवऱ्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, महादेव मंदिराकडून स्मशानभूमीकडे येणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, स्मशानभूमीतून जाणारा वाहतुकीचा रस्ता बंद करून नवीन ओटे तयार करणे, तसेच त्या ठिकाणी कायमस्वरूपी लाईट आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर टीका करताना अशोक लाडवंजारी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मेहरुण स्मशानभूमी विकसित करण्याच्या दृष्टीने पुढील एक महिन्याच्या आत ठोस प्रयत्न न झाल्यास, महानगरपालिकेसमोर मेहरुण परिसरातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘तिरडी मोर्चा’ काढण्यात येईल. विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान तिरडीवर बसूनच उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.


Protected Content

Play sound