जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका परिसरात जुन्या वादातून एका महिलेला भररस्त्यात अडवून तिला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील ८ संशयित आरोपींविरुद्ध दंगल आणि विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या आईचे घर आणि संशयित आरोपींचे घर शेजारी-शेजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात झाडाच्या फांद्या छाटल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या आईच्या घरासमोर असताना राजू धुडकू रुपवते, मधु धुडकू रुपवते, छाया सोनवणे, भाग्यश्री राजू रुपवते, चंदा राजू रुपवते, वंदा मधु रुपवते, जयश्री लखबे आणि लकीता सोनवणे या संशयित आरोपींना त्यांना गाठले.

संशयित आरोपींनी पीडितेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा त्यांनी जाब विचारला, तेव्हा आरोपींनी त्यांचे केस पकडून त्यांना ओढले आणि एका महिला आरोपीने त्यांचा गळा दाबून श्वास रोखण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, मारहाणी दरम्यान आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून त्यांची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच एका आरोपीने लोखंडी वस्तूने पीडितेच्या उजव्या हातावर प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी पोलिसांनी राजू धुडकू रुपवते, मधु धुडकू रुपवते, छाया सोनवणे, भाग्यश्री राजू रुपवते, चंदा राजू रुपवते, वंदा मधु रुपवते, जयश्री लखबे आणि लकीता सोनवणे या ८ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पुरुष आणि महिला आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश वाघ करत असून गुन्ह्याचा अधिक तपशील पोलीस घेत आहेत. पीडित महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदेशीर तरतुदीनुसार तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.



