Home क्राईम किरकोळ वादातून सासू-सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला; एकावर गुन्हा दाखल

किरकोळ वादातून सासू-सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला; एकावर गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर कुंपण घालण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका हिंसक घटनेत झाले आहे. जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे एका ६२ वर्षीय वृद्ध महिला आणि त्यांच्या सुनेवर आरोपीने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगलबाई गोपीचंद सपकाळे (वय ६२, रा. नांद्रा खुर्द) यांनी आरोपी सचिन ज्ञानेश्वर सोनवणे याला ग्रामपंचायतीच्या येण्या-जाण्याच्या सार्वजनिक जागेवर ‘कपाऊंड’ घालण्यास मज्जाव केला. “येथे कुंपण घालू नको,” असे मंगलबाईंनी म्हटल्याचा राग मनात धरून आरोपी सचिनने रागाच्या भरात मंगलबाई आणि त्यांची सून मनिषा यांच्यावर हल्ला केला.

कुऱ्हाडीने केला वार :
आरोपीने हातातील लाकडी दांडक्याच्या कुऱ्हाडीने मंगलबाईंच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या सून मनिषा यांच्या डोक्यावरही कुऱ्हाडीच्या दांडक्याने प्रहार केला. या हल्ल्यात दोघींनाही गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने पीडितांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि “जर पुन्हा माझ्या रस्त्यात आलात, तर एकेकाला उडवून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.

पोलिसांत गुन्हा दाखल :
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित मंगलबाई यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(९), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound