यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधा खराटे यांच्या “माणसं” या वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, योग शिक्षिका सुरेखा काटकर व उपप्राचार्य प्रा. एम.डी खैरनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.डॉ सुधा खराटे यांची आतापर्यंत एकूण ९ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी बोध कथांवर आधारित ४ पुस्तकांचे यशस्वी संपादन देखील केले आहे. त्यांच्या ‘नजराणा’ या कथासंग्रहास सन २०१६ चा स्व. बाबासाहेब के.नारखेडे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे.
या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींनी डॉ. खराटे यांच्या साहित्य साधनेचे कौतुक करून आपले यथोचित विचार व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी असे प्रतिपादित केले की लेखिकेने या पुस्तकात जीवनानुभवांचे वास्तव चित्रण केले आहे. हे पुस्तक वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी तर आभार सुभाष कामडी यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.