धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना चोप; इचखेड्यातील घटना

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील इचखेडा या आदिवासी बहुल भागातील लोकांना आमीष दाखवून धर्माचा प्रचार करणार्‍यांना लोकांनी चोप दिल्याची घटना घडली असून या सर्वांनी पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम पाडे व वस्ती वाडयांवर मोठया प्रमाणावर आदीवासी बांधव यांचे वास्तव्य आहे. यातील बहुसंख्य आदीवासी बांधव हे कष्टकरी व हातावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. त्यांच्या या आर्थिक दुर्बलपणाचा फायदा घेत काही धर्मप्रचारक या भोळ्या गोरगरीब आदीवासींना आर्थिक आमीष दाखवुन त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच एका घटनेची पुनरावृत्ती आज तालुक्यातील इचखेडा येथे घडण्याची शक्यता होती. मात्र गावकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

आज एका परधर्मीय लोकांच्या समूहाने गावात येऊन लोकांना आमीष दाखविले. आर्थिक प्रलोभन देऊन ते आपल्या धर्माचा प्रचार करत असल्याचे दिसून आले. यामुळे गावातील लोकांनी त्यांना विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना चोप दिला. त्यांना एका खोलीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र सुमारे १५ जणांच्या या समूहाने येथून पलायन केले. या प्रकरणाची परिसरात चर्चा असली तरी शेवटचे वृत्त हाती आले तोवर पोलीस स्थानकात याबाबत नोंद करण्यात आली नव्हती.

Protected Content