उपचाराअभावी ‘मसाका’च्या कर्मचार्‍याचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वेतनाचे पैसे थकीत असल्याने उपचार घेऊ न शकलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍याचा आज मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हा अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवर्‍यामध्ये सापडला आहे. यात येथे काम करणारे कर्मचारी आणि ऊस उत्पादक भरडले जात आहेत. यात कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची मोठी रक्कम बाकी असल्याने त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच उपचार घेण्यासाठी पैसे नसल्याने देवेंद्र गिरधर पाटील या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पुन्हा नव्याने अधोरेखीत झाला आहे. यावल तालुक्यातील कोरपावली येथील राहणारे मधुकर सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेले देवेन्द्र गिरधर पाटील यांचे थकीत पगार म्हणुन कारखान्याकडे एकूण साडेपाच लाख रुपये घेणे होते. यातच ते आजारी पडले. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

देवेंद्र गिरधर पाटील (वय ४८ ) हे मधुकर सहकारी साखर कारखान्यात गेल्या पंधरा वर्षापासून डिस्टलरी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे ३६ महिने कामाचे वेतन थकीत होते. यासोबत त्यांच्या ऊसाचे एक लाख रूपये देखील बाकी होते. ही रक्कम त्यांना मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. यामुळे आता तरी कर्मचार्‍यांचे थकीत वेतन मिळावे अशी मागणी करण्यात येत आहेत.

देवेंद्र पाटील हे गेल्या तीन वर्षापासून आजारी होते त्यांना उपचारासाठी पैसा उपलब्ध नसल्याने त्यांचा आज दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. पाटील यांचे कारखान्याकडे साडेपाच लाखांच्या जवळपास घेणे आहे. जिल्हा बँकेने आता तरी जागृत होऊन अशा गरजू कर्मचार्‍यांचे पेमेंट अदा करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे देवेंद्र पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते, त्यांच्यामुळे त्यांची परिस्थिती आर्थिक नाजूक आहे हे बँकेने लक्षात घेण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Protected Content