यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी येथील महर्षी व्यास मंदिरासाठी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिर हे अद्वितीय असून देशातील महत्वाच्या तीर्थस्थळांमध्ये याचा समावेश होतो. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. तर गुरूपौर्णिमेला देशभरातून लक्षासवधी भाविक येथे येत असतात. या देवस्थानातील विविध विकासकामांसाठी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने पर्यटन तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी या मंदिरासाठी सुमारे चार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचे शासकीय परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
चार कोटी रूपयांच्या निधीतील एक कोटी २० लक्ष रूपयांचा निधी जिल्हाधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला असून उर्वरित निधी लवकरच वर्ग होणार आहे. या निधीतून महर्षी व्यास मंदिरात ग्रंथालय, कीर्तन सभागृह, प्रसादालय आणि ऑडिटोरियमसह अन्य कामे करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात सुविधा होणार आहे.
दरम्यान, या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आनंद व्यक्त केला असून या निधीमुळे महर्षी व्यास व श्रीराम मंदिरातील अत्यावश्यक कामांना गती मिळणार असल्याचे नमूद केले. या कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.