पालकमंत्र्यांच्या हस्ते चिंचोली येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे भूमिपुजन करण्यात आले.  घरगुती, कृषी आणि औद्योगिक ग्राहकांनी वीज वितरणची थकबाकी तातडीने भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी केले आहे.

 

यावेळी पालकमंत्री बोलतांना म्हणाले की, तालुक्यातील चिंचोली येथे वीज उपकेंद्र असावे ही मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. मध्यंतरी कोविडमुळे याला निधी मिळण्यात अडचणी आल्या असल्या तरी कृषी धोरण-२०२० अंतर्गत जिल्ह्यातील पहिले सब-स्टेशन येथे उभारण्यात येणार असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील घरगुती ग्राहकांना तर लाभ होणारच आहे. पण, यासोबत शेतकरी आणि परिसरातील उद्योजकांना हे उपकेंद्र उर्जा प्रदान करणार असून यामुळे परिसरातील प्रगतीला वेग येणार असल्याचे सांगितले. तसचे  घरगुती, कृषी आणि औद्योगिक ग्राहकांनी वीज वितरणची थकबाकी तातडीने भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

 

या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उपस्थिती देणारे उर्जामंत्री ना. नितीन राऊन यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून ते उमदे आणि विकासाभिमुख असल्याची वाखाणणी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून   जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता मो. फारूक शेख, जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरूध्द नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, पंचायत समिती सभापती पती जनाआप्पा पाटील, संजय वराडे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, अनिल भोळे, बाजार समिती सदस्य पंकज पाटील, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, प्रवीण पाटील, योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, धानवडचे सरपंच संभाजी पवार, उमाळ्याचे राजू पाटील, कुसुंबाचे दंगल पाटील, रायपूरचे नितीन सपकाळे, कंडारीचे मनोज धनगर, देवीदास कोळी, जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी, नंदकुमार देशमुख, साईराज बिर्‍हाडे, ब्रिजलाल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक शेख यांनी केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व उर्जामंत्री ना. नितीन राऊन यांच्या सहकार्याने उपकेंद्राच्या कामास प्रारंभ झाला असून नवीन वीज उपकेंद्राचे काम मुदतीत व दर्जेदार होणार असल्याची खात्री त्यांनी दिली. सध्या चिंचोली उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. वाढत्या मागणीमुळे व यंत्रणेवरील भार वाढत असून या भागात कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच चिंचोली गावठाण, चिंचोली शेती यांची लांबी ३८ किलोमीटर होती. यामुळे अडचणी येत होत्या. जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहा नवीन उपकेंद्र उभारणे व ७ उपकेंद्रांची क्षमता वाढ करणे प्रस्तावित केले आहे. यासाठी लवकरचा मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

 

मुख्य अभियंता कैलास हुमणे म्हणाले की, महामंडळाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. यामुळे कृषी धोरण २०२० अंतर्गत शेतकर्‍यांनी वेळेवर वीज बिले भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. थकबाकीसाठी अनेक योजना जाहीर केल्या असून यांची मुदत लवकरच संपत आहेत. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि उद्योजकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन केले.

 

(नवीन वीज उपकेंद्रामुळे (सब स्टेशन ) काय होणार फायदे

चिेंचोली परिसराला ३३/११ केव्ही व्ही सेक्टर उपकेंद्रातून पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या विजेची मागणी, यंत्रणेवरील वाढता भार यामुळे शेवटच्या ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. व्यत्ययाला सामना करावा लागत होता. त्यामुळे ३ कोटी ४१ लाख रूपये निधीतूुन नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. याची क्षमता पाच एमव्हीए इतकी असून याद्वारे तीन फिडर कार्यान्वित होणार आहे. यात उमाळा गावठाण-११ किलोमीटर; उमाळा शेती-९ किलोमीटर व धानवड शेती ५ किलोमीटर यांचा समावेश आहे.

 

सदर योजना ही कृषी धोरण २०२० अंतर्गत पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे. यामुळे कृषी व गावठाण वाहिनी वेगळी होणार असून चिंचोली, देव्हारी, धानवड, उमाळा, कुसुंबा, कंडारी या गावांना २४ तास वीज पुरवठा होईल. महत्वाची बाब म्हणजे, नवीन वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर व्ही-सेक्टर या उपकेंद्रातून जळगाव एमआयडीसी उपकेंद्राचा भाग कमी होऊन एमआयडीसीतील उद्योग धंद्यांना सुरळीत वीज पुरवठा होऊन, उद्योगांना चालना मिळणार आहे. या परिसरातील सुमारे ४ हजार ५०० घरगुतील कृषी व औद्योगीक ग्राहकांना फायदा होणार आहे.

 

*याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, चिंचोली परिसरात ३३/११ केव्ही उपकेंद्राचे उदघाटन करतांना मला खूप आनंद होत आहे. या उपकेंद्राची कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांनी मला येथे बोलावून या समस्येचे निराकरण करण्याचे साकडे घातले होते. यासाठी मला खूप पाठपुरावा करावा लागला. कोविडमुळे यासाठी निधी मिळण्यात अडचणी आल्या. मात्र आज अखेर हा क्षण उजाळला. शहरात गटर, वॉटर आणि मीटरचा विचार केला जातो. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातही रस्ते, पाणी आणि वीज यांचा विचार केला जातो. या अनुषंगाने धानवड येथून सुप्रीमला मिळणारा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. हा रस्ता करमाडपर्यंत जात असून यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले असूनर पूल बांधकाम ही उभारण्यात येत असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. शेत पाणंद रस्त्यांना वाढीव निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जि.प. सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. तर आभार आभार जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांनी मानले.

 

Protected Content