चालकाचा ताबा सुटल्याने मक्याने भरलेला ट्रक थेट नाल्यात कोसळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीक असलेल्या कुरकुरे नाल्याजवळ मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात मक्याने भरलेला ट्रक नाल्‍यात पलटी झाल्याची घटना बुधवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याघटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात मकाने भरलेला ट्रक क्रमांक (एमपी ३९ यूपी ७२९९) हा जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीक असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना अचानक ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्याच्या खाली कोसळून पलटी झाला आहे. या अपघातात क्लिनर संजयकुमार पांडे (वय-३५) रा. बिहार हा गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला क्लिनरला बाहेर काढले. तर ट्रकवरील चालकाची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. जखमी झालेल्या क्लिनर संजयकुमार पांडे याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोकॉ अतुल पाटील करीत आहे.

Protected Content