Home क्राईम वरणगावात प्रेमविवाहाच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला ; तिघांना अटक, पाच आरोपी फरार

वरणगावात प्रेमविवाहाच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला ; तिघांना अटक, पाच आरोपी फरार

0
4

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रेमविवाहाच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरात एका तरुणावर लोखंडी रॉड आणि धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. या हल्ल्यात कृष्णा माळी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच आरोपी फरार आहेत.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गोपाळ संजय माळी (वय २४, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याने दोन वर्षांपूर्वी शुभांगी हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहाला शुभांगीच्या नातेवाइकांचा विरोध होता. विवाहानंतर काही काळ बाहेरगावी राहिल्यानंतर हे दाम्पत्य वरणगाव येथे परतले. त्यानंतर प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोपाळ माळी हा मित्रांसोबत फुलगाव पुलाजवळ महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्याचवेळी त्याच्या पत्नीचा फोन आला. कृष्णा माळी याला मारहाण करण्यासाठी नातेवाईक आल्याचे तिने सांगितले. ही माहिती मिळताच गोपाळ माळी आणि त्याचे मित्र घरी पोहोचले. त्यावेळी घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असताना एका आरोपीने कृष्णा माळी याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने धारदार चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता चाकूचा वार त्याच्या चेहऱ्यावर लागला. यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गोपाळच्या मित्रालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर जखमी कृष्णा माळी याला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी गोपाळ माळी याने वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुदर्शन ऊर्फ पवन संजय बोरसे ऊर्फ धनगर (वय २३), सागर बापू धनगर (वय २६) आणि धीरज संजय बोरसे ऊर्फ धनगर (वय १८, सर्व रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) या तिघांना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३९ वाजता अटक केली. सोपान पंडित धनगर, निर्मलाबाई बापू धनगर, मिराबाई संजय धनगर, मयूर भागवत धनगर आणि निलेश राखुंडे हे अन्य पाच आरोपी फरार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकुळी यांच्यासह पोलीस कर्मचारी भूषण माळी, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, सुखराम सावकारे आणि मनोज बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound