यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. चोपडा-यावल रोडवरील वडोदा गावाजवळ असलेल्या गॅस गोडावूनसमोर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत पोलिसांनी १५ लाखांच्या डंपरसह एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ते यावल रोडवरील वडोदा गावाजवळ असलेल्या एका गोडावून जवळून विना परवाना वाळू वाहतूक होत असल्याचे माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने कारवाई करत डंपर (क्रमांक MH 19 CP 916) विनापरवाना वाळू वाहतूक करतांना मिळून आला. शासनाच्या परवानगीशिवाय आणि रॉयल्टी भरल्याशिवाय वाळूची चोरी केली जात समोर आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अक्षय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित वाहनचालक मयूर पडकर कोळी (वय २२, रा. रिधुर, ता. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




