Home करियर यावलच्या चारुदत्त अढळकरची फॅशन शोमध्ये दमदार कामगिरी

यावलच्या चारुदत्त अढळकरची फॅशन शोमध्ये दमदार कामगिरी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावलच्या तरुणाईसाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या यशात एम.जे. कॉलेज, जळगाव येथील ११ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी चारुदत्त जितेंद्र अढळकर याने ‘Mr and Miss Jalgaon Season 4 Fashion Show’ स्पर्धेत ‘Best Walk Mr. Jalgaon’ हा मानाचा किताब पटकावत लक्ष वेधले आहे. अवघ्या १७ व्या वर्षी रॅम्पवर आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत चारुदत्तने फॅशन क्षेत्रात दमदार एन्ट्री केली असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव येथे ग्रीन वुड्स बालानी, मेहरूण ट्रॅकजवळ पार पडलेल्या या प्रतिष्ठित फॅशन शोचे आयोजन Question Mark Fashion Brandच्या वतीने करण्यात आले होते. २५ एप्रिल रोजी सायंकाळी पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र चारुदत्त अढळकर याच्या प्रभावी रॅम्प वॉक, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि वेगळ्या शैलीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत ‘Best Walk Mr. Jalgaon’ हा किताब त्याने आपल्या नावावर केला.

या स्पर्धेचे आयोजन जॅस तिवारी, सिद्धार्थ अहिरे आणि आर्यन बजाज यांनी केले होते. फॅशन आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या या मंचावर चारुदत्तने आपल्या सादरीकरणातून वेगळी छाप उमटवत तरुण मॉडेल म्हणून आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असतानाच फॅशन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणे हे त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.

चारुदत्तच्या या यशामुळे यावल आणि जळगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय त्याने आई-वडिलांसह मार्गदर्शक जॅस तिवारी यांना दिले असून भविष्यात मॉडेलिंग क्षेत्रात आणखी मोठी प्रगती करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

यावल स्टेट बँकेचे कॅशियर सुरेश अढळकर यांचा नातू असलेल्या चारुदत्तने लहान वयातच मिळवलेल्या या यशामुळे स्थानिक पातळीवर त्याच्याबद्दल विशेष अभिमान व्यक्त होत आहे. अभ्यासासोबतच फॅशन क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते, हे त्याने दाखवून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound