Home क्रीडा महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पै. नायाब कुरैशी यांची सर्वानुमते निवड; ज्येष्ठ...

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पै. नायाब कुरैशी यांची सर्वानुमते निवड; ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान

0
4

नंदुरबार-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित ‘महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळा व पहिले अधिवेशन’ उत्साहात पार पडले. या सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्याला विशेष सन्मान मिळाला असून, सुप्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुस्तीचा प्रचार व प्रसार, भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन तसेच युवा पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी पै. नायाब कुरैशी यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संग्राम कांबळे आणि उपाध्यक्ष अमोल मदने यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी भूषविले. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतील ज्येष्ठ मल्ल तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हिंदकेसरी, रुस्तमे हिंद आणि १९६६ चे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार तसेच बंडा पाटील रेंट्रेकर यांच्या वतीने त्यांचे पुत्र दिनेश पाटील यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.

या महासन्मान सोहळ्यात कुस्ती क्षेत्रातील एकूण ४२ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी बाळासाहेब काळे, संग्राम कांबळे, अमोल मदने, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, शामराव जाधव, भगवान बापू करणकाळ, राम कानडे, गोरख पाटील, संजय आवळे, नितीन ठोंबरे, नजीब तांबोळी, सागर येळके, पूनम पाटील, रंगा कचवे, गंगाराज कांबळे, राज यादव, रामचंद्र शिंगे, विश्वास हरुगले, दादा लबडे, संदीप पाटील, जगदीप पाटील, गौरव पाटील, अमृता पुजारी, रोहिणी देवला, विष्णू जोशीकर, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र संभाजी पाटील-कुडीतकर तसेच वसंत रंगनाथ कळेकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतील ज्येष्ठ मल्ल, खेळाडू, पदाधिकारी आणि कुस्ती क्षेत्राशी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा विशेष ठरला.

पै. नायाब कुरैशी यांच्या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्राला संघटित स्वरूप देण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कुस्तीची परंपरा असून, अनेक युवा मल्लांना योग्य प्रशिक्षण, स्पर्धेचे व्यासपीठ आणि प्रोत्साहनाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष म्हणून पै. कुरैशी यांच्यासमोर युवा पैलवानांना संधी उपलब्ध करून देणे, कुस्ती स्पर्धांचे आयोजन वाढविणे आणि जिल्ह्यात कुस्तीचा प्रसार करण्याचे आव्हान असणार आहे.

त्यांच्या निवडीचे नंदुरबार जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी, मल्ल आणि क्रीडा क्षेत्रातील विविध स्तरांतून स्वागत होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू पैलवानांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या निवडीचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound