बोदवड न्यायालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बोदवड न्यायालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ॲङ अर्जुन पाटील यांनी आदीवासी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय  योजना तसेच विविध कायदे, घटनेतील ‍विविध कलमे  याबाबत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. प्रमुख उपस्थिती  ॲङ अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, ॲङ के.एस.इंगळे हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शैलेश पडसे,मनोगत ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. के.एस.इंगळे, ॲङ संतोषकुमार कलंत्री   यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमास ॲड.विजय मंगळकर न्यायालयीन कर्मचारी  वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.एस.महाजन हे उपस्थित होते.

 

याप्रसंगी ॲड. अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५ हजार आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७ हजार भाषा आहेत. जगात सर्वात जास्त शोषण हे आदिवासींचे झालेले आहे व आजही होत आहे. त्यांना मागासलेले, रानटी असे संबोधून त्यांना हिणवले जाते. त्यांना त्यांच्या अधिकारांपासून, हक्कांपासून वंचित ठेवले जाते. ही अशी परिस्थिति लक्षात घेऊन त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी 1916 च्या दशकात अमेरिकेत तसेच विविध देशांमध्ये चळवळी सुरू झाल्या. तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने 1982 मध्ये 9 ऑगस्ट रोजी जिनिव्हामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले. यानंतर पुढील काही वर्षे जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा, विचारमंथन होत राहिले. पुढे संयुक्त राष्ट्राने 1994 हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच 1995 ते 2005 हे पहिले आदिवासी दशक तर 2005 ते 2014 हे दुसरे आदिवासी दशक म्हणून घोषित केले. 9 ऑगस्ट 1982 रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीची आठवण म्हणून 9 ऑगस्ट 1995 रोजी जगात पहिल्यांदा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

 

आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, त्यांचा जल- जंगल व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती,- ओळख, अस्तित्व, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. इंग्रजांविरुद्ध भिल्लांचा उठाव, संथालांचा उठाव, मुंडा उठाव,कच्छचा उठाव, पहाडी आंदोलन,चुवार आंदोलन,गोंड आंदोलन,कोल आंदोलन, सरदार मुंडा आंदोलन यावरून आदिवासी जमातींनी इंग्रजांविरुद्ध न्याय हक्कासाठी, मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्रथम आंदोलने केलेली आहेत.

Protected Content