बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात सध्या मे महिना चालू असल्याने उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यात लग्नसराई असल्यामुळे थंड पेय आणि थंड पाण्याची मागणी वाढली आहे. सर्वत्र पाणी बोटल प्लँटमधून थंड पाण्याचे जार मागवले जात आहेत. ३०-३५ रुपयांत सहज उपलब्ध होणारे हे थंड पाणी खरोखर आरोग्यासाठी चांगले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पाणी प्लांटवाल्यांकडे प्रशासनाचा तपासणी अधिकारी आतापर्यंत जातच नसल्याचा दावा नागरिक करीत आहेत. या प्लांटमध्ये किंवा परिसरात स्वच्छेतेचा अभाव दिसून येत आहे. हे पाणी तयार करीत असताना फिल्टर मशिनरी चालू असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही व काही ठिकाणी तर फिल्टर मशीन बंद करून फक्त पाणी थंड केले जात असून त्याची विक्री सर्रास बाजारात केली जात आहे. तालुक्यातील दुकानात व लग्न समारंभात दुष्काळाचा फायदा घेत हे बाटली बंद पाणी व्यावसायिकांनी तीस ते पस्तीस रुपये दराने विकण्याचा हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरु आहे. पाणीटंचाईमुळे पाण्याचे टँकर मागवून अर्धवट थंड करून ग्राहकांना दिले जात आहे, या अशुद्ध पाण्यामुळे डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. पाणी जार प्लांटसाठी शासनाने ठोस निकष सील बंद बाटलीच्या पाण्याप्रमाणे दिलेले नसल्याने त्याचा सर्वत्र गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध विभागाकडून तसेच स्थानिक प्रशासनानेही या पाण्याच्या शुद्धतेबद्दल तपासणी करून घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी व प्लांटमधील यंत्रणा वापरली जाते की नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
त्याबरोबर हे पाणी जार व कॅन वाहतूक करणारी वाहनेही धोकादायक पद्धतीने वाहतूक करीत असतात. वाहतूक परवाना नसताना धूम स्टाईलने अल्पवयीन मुले आपे रिक्षा, मोटार सायकल, छोटा मिनीडोअर यामार्फत ही वाहतूक करताना दिसतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होत असतात. त्याकडे पोलीस प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. एकूणच अशुद्ध थंड पाणी विकण्याचा व्यवसाय लोकांची गरज लक्षात घेवून जोरात सुरु आहे, पण त्यात लोकांच्या आरोग्याशीही खेळ केला जात असल्याने संबंधितांनी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे.