वृक्षारोपणात रोटरीने ओलांडला ३० हजारांचा आकडा

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   रोटरी क्लब खामगांवने मागील ५ वर्षात वृक्षारोपणाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी लावलेले सुमारे ३० हजार वृक्ष आणि ठिंबक सिंचन पद्धतीने व वॉटर ऍम्ब्युलन्सचा वापर करून योग्य संवर्धन केल्यामुळे जगणारे वृक्ष यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यामुळेच खामगांव व परिसरात हरित क्रान्ती आल्यासारखी जाणवते.

 

निसर्गाशी नाते सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”, वृक्ष हे निसर्गाची शोभा वाढवत असतात. पर्यावरणाला वृक्षांमुळे सुंदरता प्राप्त होते. वृक्षांमुळे मनुष्याला नेहमी फायदाच होतो. आपले अस्तित्व राहण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका बजावत असतात. पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला फळेदेखील मिळतात. आपले आरोग्य नीट राहण्यासाठी झाडे आपल्याला स्वछ हवा निर्माण करून देतात. अनेक वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतो. औषधी गुणधर्म असलेल्या झाडांच्या पानापासून, मुळांपासून वेगवेगळ्या आजारांवर औषधे मिळतात. वृक्ष हे पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

 

मातीची होणारी धूप वृक्षांमुळे खूप कमी होते. एव्हढे सर्व फायदे लक्षात घेऊन रोटरी क्लब खामगांवने मागील ५ वर्षात वृक्षारोपणाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी लावलेले सुमारे ३० हजार वृक्ष आणि ठिंबक सिंचन पद्धतीने व वॉटर ऍम्ब्युलन्सचा वापर करून योग्य संवर्धन केल्यामुळे जगणारे वृक्ष यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यामुळेच खामगांव व परिसरात हरित क्रान्ती आल्यासारखी जाणवते.  याच कार्याची दाखल घेऊन मागील ५ वर्षांपासून खामगांव क्लब डिस्ट्रीक्ट ३०३० स्तरावर पर्यावरणपूरक प्रकल्पाचा पुरस्कार जिंकत आहे. यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन लायन्स क्लब मेन व लायन्स क्लब संस्कृती यांनी देखील रोटरी क्लबला आपला सहकार्याचा हात पुढे करीत संयुक्तपणे वृक्षारोपणाची मोहीम फत्ते केलेली आहे.

 

याच परंपरेला पुढे नेत मागील शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या ठिकाणे वृक्षरोपणाची मोहीम राबविण्यात आली. शनिवारी दुपारी ४ वाजता भाजप सोशल मिडिया सेलचे महाराष्ट्र प्रभारी श्री सागरभाऊ फुंडकर यांच्या विशेष उपस्थितीत जनुना देवराई फेज-४ मध्ये ८०५ वृक्षांची लागवड करण्यात आली.  तसेच दादा दादी पार्क येथे ७० वृक्षांची लागवड करण्यात आली. रविवारी सकाळी ८ वाजता माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्री दिनेशजी गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत रो विशाल गांधी यांच्या एमआयडीसी स्थित फार्म हाऊस येथे ४४० वृक्षांची लागवड करण्यात आली. याच दिवशी सकाळी साढेआठ वाजता  एमआयडीसी पोलीस चौकी येथे खामगांव विधानसभेचे आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक थोरात साहेब, उपविभागीय अधिकारी ठाकरे साहेब, खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री शांतीकुमार पाटील व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री परदेशी साहेब यांच्या विशेष उपस्थितीत ५२० वृक्षांची लागवड करण्यात आली.  नंतर सकाळी ९ वाजता एमआयडीसी स्थित नांदुरा रोड वरील तुलसी कृपा ऍग्रोटेक येथे खामगांव विधानसभेचे आमदार अँड आकाश फुंडकर व श्री सुरेशशेठ चोपडा यांच्या साक्षीने १०५० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच रोटरी क्लबचे  माजी अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांच्या औद्योगिक परिसरात ३८० वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे रोटरीचे सक्रिय सदस्य रो किशन मोहता हे स्वतः त्यांच्या एमआयडीसी स्थित फॅक्टरीत बिया आणि कलमांपासून अर्धवाढ झालेले वृक्ष तयार करतात आणि नंतर त्यांचेच अन्य ठिकाणी रोपण केल्या जाते.

 

अशा त-हेने यावर्षी रोटरी क्लब खामगांवने एकूण ३२६५ वृक्षांची लागवड केली आणि हे कार्य पावसाळा संपेपर्यंत अव्याहतपणे चालणार आहे असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. कार्यक्रमानंतर तुलसी कृपा ऍग्रोटेक यांचे सौजन्याने सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख रो प्रमोद अग्रवाल, सह-प्रकल्प प्रमुख रो किशन मोहता, रो प्रफुल अग्रवाल, रो कमल सोनी , अध्यक्ष रो सुरेश पारीक,  सचिव रो आनंद शर्मा यांचेसह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content