राज्यभरात मुसळधार पाऊस : अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जुलै महिना सुरू होऊनही दडी मारून बसलेला वरूणराजा आता मेहरबान झाल्याचे दिसून येत असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण आणि मुंबईसह अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कालपासून राज्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. यात विशेष करून कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तळकोकणात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. चिपळूणमध्येही जोरदार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू असून रोहा येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

परशुराम घाटात दरड कोसळली यामूळ घाट मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळं वाहनांच्या रांगाच रांगा चिपळूण मधील हायवेवर पाहायला मिळत आहेत. वाहन चालकांबरोबर प्रवाशांचे देखील मोठे हाल होत आहेत. कोकणात एनडीआरएफचे चमू तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, ठाणे, पालघर जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. मुंबईत सोमवारी दिवसभर काहीशी उघडीप घेतलेला पाऊस सायंकाळपासून बरसात सुरू झाली. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून लोकलच्या वेळापत्रकावरही पावसाचा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि कोकणसह राज्यातील अनेक भागांमध्ये आगामी चार ते पाच दिवसांमध्ये याच प्रकारे मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Protected Content